महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) यांनी दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षा, सन्मान आणि कार्यपरिस्थिती सुधारणा यांच्या मागण्यांसाठी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील मॅग्मो प्रतिनिधी आणि वैद्यकीय अधिकारी या आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी झाले.
आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ पासून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शासनाने चर्चा करण्याची तयारी व्यक्त केली.
दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर येथील शासकीय निवासस्थानी 'रामगिरी' येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मॅग्मो प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दिवंगत डॉ. मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचे धोरण, कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाय, तसेच सेवा हक्क आणि कायदेशीर संरक्षण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
मा. मुख्यमंत्र्यांनी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सादर करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांना तत्त्वतः मान्यता दिली असून उर्वरित मागण्यांवर देखील सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले. तसेच संबंधित शासन व प्रशासकीय विभागांना आवश्यक निर्देश देण्याबाबतही हमी व्यक्त केली.
या समाधानकारक चर्चेनंतर मॅग्मोच्या वतीने राज्यव्यापी सुरु असलेले कामबंद आंदोलन **तूर्तास स्थगित** करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात येते. तथापि, आश्वासनांची वेळेत पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
बैठकीमध्ये उपस्थित:
- डॉ. राहुल कन्नमवार – अध्यक्ष, मॅग्मो महाराष्ट्र
- डॉ. संदीप गेड़ाम – वरिष्ठ उपाध्यक्ष
- डॉ. प्रमोद रेवाळे – राज्य उपाध्यक्ष
- डॉ. नरेंद्र डोमके – अध्यक्ष, प्रसिद्धी सेल
मॅग्मो महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठीचा संघर्ष पुढेही ठामपणे चालू ठेवेल.
जय मॅग्मो.